“एम्पायर ऑफ डस्ट” म्हणजे “धुळीचे साम्राज्य” अशी ओळख फलटण शहराची असल्याप्रमाणे सध्याचं फलटण शहर दुर्दैवाने निश्चितच दिसत आहे आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. तसेच फलटण तालुका देखील मागे नाही, “कॅपिटल ऑफ ट्रान्सफॉर्मर थेप्ट” म्हणजे “ट्रान्सफॉर्मर चोरीची राजधानी” म्हणून देखील ओळखला जातो. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यासाठी फलटण प्रसिद्ध आहे. परंतु सध्या आपला विषय आहे तो रस्त्यावरील खड्डे व धुळीचा.
फलटण शहरातील रस्त्यांवरती असंख्य खड्ड्यांचा व धुळीच्या साम्राज्याचा विकास अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो आहे. वाहनांच्या वाहतुकी वेळी तर ही धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडत असते. शहरांमध्ये डांबरीकरणाचा बोजवारा पूर्णपणे उडालेला दिसत आहे. प्रवास करत असताना सामान्य जनतेच्या, नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या नाका तोंडात ही धूळ जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने व दुकानातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, आदी सर्वजण या धुळीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. रस्त्यावरील धूळ ही सातत्याने दुकानात येत असते. अक्षरशः फलटण शहरातील जनता, नागरिक, व्यापारी व एकंदरीत सर्व फलटणवासी या धुळीमुळे हैराण झालेले आहेत. परंतु याकडे लक्ष द्यायला मात्र सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासनास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.
फलटणची बारामती व्हावी याकरिता फलटणकारांनी चक्क आमदारच बदलण्याची किमया करून दाखवली होता. परंतु एक वर्ष झाले तरी देखील शहरातील रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे व धुळीचे साम्राज्य असलेले दिसत आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. फलटणचा गलथान कारभार कधी सुधारणार अशी चर्चा फलटणकर जनता सातत्याने करत असते. या धुळीमुळे शहरातील व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका नाकारता येणार नाही. धुळीमुळे केवळ श्वसनविकार व केवळ दमा बळावत नाही तर धुळीचे कण कानात गेले तर श्रवणक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. हा परिणाम दृश्य स्वरूपातील व पटकन होणारा नसला तरीही कालांतराने कानाने ऐकण्याची क्षमता कमी कमी होत जाते.
मागील आठवड्यात वरूण राजा दिवसातून साधारण एकदा तरी रोज थोड्या वेळासाठी का होईना फलटण शहरात बरसुन रस्त्याला एक प्रकारे अंघोळ घालत आहे. जणू काही फलटणकर जनतेची त्याला दया आल्यासारखी दिसत आहे. वरूण राजा रोज थोडा वेळ का होईना फलटणकरांची काळजी घेण्यासाठी मागील आठवड्यापासून फलटणमध्ये सातत्याने आपली हजेरी लावत आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता का होईना परंतु महत्त्वाचा असा दिलासा मिळाला आहे आणि फलटण शहर हे रामभरोसे सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
जेव्हा हा वरूण राजा बरसत असतो त्यावेळी तो जनतेची मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सारखा भासत असतो. कधीकधी जनतेला असंही वाटत असेल की यालाच आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं असतं तर बरं झालं असतं. कधीकधी असं वाटतं की या वरूण राजाने बांधकाम विभागाकडुन नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाणी मारण्याचं कंत्राट तर घेतलं नसेल ना.
वरूण राजा, तू केलेल्या निस्वार्थी सहकार्याबद्दल तुझे फलटणकर जनतेच्या वतीने नम्रपूर्वक व मनःपूर्वक जाहीर आभार.
जय हिंद….! जय महाराष्ट्र…!







