फलटण : झिरपवाडीत पाझर तलावाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीची विहीर व पाईपलाईन उपलब्ध असूनदेखील त्या ठिकाणी अंदाजे तीन महिन्यांपुर्वी अतिरिक्त ट्रान्सफाॅर्मर मंजूर झालेला असतानाही सदर ठिकाणचे ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरू असल्यामुळे झिरपवाडी गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्या रेखा गुंजवटे यांनी दिली होती.
प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांना सदर बातमी समजताच त्यांनी तातडीने फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता ग्रामोपाध्ये यांना झिरपवाडी पाझरतलाव येथील ट्रान्सफाॅर्मर तात्काळ बसवून झिरपवाडी गावातील ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर ट्रान्सफॉर्मर जोडण्याचे काम वीज महावितरणने तात्काळ पूर्ण केले. सदर कामाची तात्काळ पूर्तता झाल्यामुळे झिरपवाडी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.







