जिल्ह्यातील कारखान्यांवर कठोर कारवाईचे आयुक्तांना निवेदन
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून जाणीवपूर्वक ऊस नियंत्रण कायद्याचा नियमभंग केला जात असुन, विशेषतः फलटण तालुक्यातील स्वराज ॲग्रो शुगर उपळवे कारखान्याविरोधात तात्काळ कारवाईबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त पुणे यांना सादर करण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती वृत्तपत्रांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलेली आहे.
फलटण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने साखर आयुक्त, पुणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील एकुण १७ सहकारी व खाजगी कारखान्यांकडून सरकारी नियम पायदळी तुडवले जात असुन कायद्याची कोणतीही तमा न बाळगता शेतकऱ्यांबाबत होत असलेल्या अनियमित कारभाराबाबत साखर आयुक्त पुणे यांचे निवेदनाद्वारे कान टोचले आहेत. साखर आयुक्तालयाने जर सदर कारखान्यांवर तातडीने कार्यवाही केली नाही तर साखर आयुक्तांच्या दालनात बेमुदत मुक्काम आंदोलन करणार असल्याचा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल अशी माहिती लेखी निवेदनाद्वारे साखर आयुक्तालय प्रशासनास देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण १७ सहकारी व खाजगी साखर कारखान्यांपैकी एकाही कारखान्याने साखर आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा उघड अन्याय आहे. तसेच यामध्ये फलटण तालुक्यातील स्वराज ॲग्रो शुगर उपळवे साखर कारखाना हा नियमभंगात आघाडीवर असून, गेली साठ दिवस हा कारखाना बेकायदेशीरपणे चालू आहे. परंतु तरीदेखील आजपर्यंत एफ.आर.पी. बिल या कारखान्याने अदा केलेले नाही, ऊस दर जाहीर केलेला नाही, साखर आयुक्त कार्यालयाचे कोणतेही आदेश व नियम पाळलेले नाहीत, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक उघडपणे सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच या कारखान्याकडून ऊस नियंत्रण कायद्याचा भंग करण्याचा प्रकार म्हणजे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकारांना थेट आव्हान देण्यासारखे असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कारखानदारांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून संघटनेने आक्रमक होत साखर आयुक्तालयाकडे मागणी केली आहे की ऊस नियंत्रण कायदा 1966 चे उल्लंघन केल्याप्रकरणी या कारखान्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच गाळप परवाना रद्द करावा, शेतकऱ्यांची सर्व थकीत एफ आर पी सह ऊस बिले व्याजासह त्वरित मिळावीत, स्वराज ॲग्रो शुगर साखर कारखान्यावर तात्काळ प्रशासकीय नियंत्रण (अत्यावश्यक प्रशासकीय कारवाई) लागू करावी. तसेच नियमभंग करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशा प्रकारच्या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सातारा जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, फलटण शहर संघटक किसन शिंदे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, दादा जाधव, तेजसिंह जाधव, आप्पासो दुधाळ, आदी उपस्थित होते.







