प्रदीप झणझणे यांच्या पाठपुराव्याला यश
फलटण, साखरवाडी : प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, साखरवाडी (ता. फलटण) येथील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी महावितरणकडून तातडीने बसविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीजपुरवठ्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी डीपी चोरांकडून संबंधित डीपी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. दरम्यान, डीपी खाली जमिनीवर पडल्याने तो नादुरुस्त झाला आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी शेतातील पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
महावितरणकडून तातडीने प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रजा गट जनसंपर्क कार्यालय, फलटण येथे जाऊन प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांची भेट घेत समस्या मांडली.
यानंतर झणझणे यांनी शेतकऱ्यांसह फलटण येथील महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डीपी चोरीला गेल्यानंतर अथवा नादुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा अधिक काळ खंडित राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, ही बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने डीपी बसविण्याची मागणी केली.
या पाठपुराव्यानंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी साखरवाडी येथील १४ फाटा पाणी पुरवठा डीपी तातडीने बसविण्यात आला आणि परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीज समस्येला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतपिकांवरील संभाव्य संकटही टळले आहे.
डीपी सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल प्रजा गटाचे व वीज महावितरणचे आभार मानले. या कामाबद्दल प्रदीप झणझणे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
“शेतकऱ्यांचा वीजप्रश्न हा केवळ एका डीपीपुरता मर्यादित नसून, त्यांच्या पिकांच्या आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे डीपी चोरी अथवा नादुरुस्तीच्या घटना घडल्यानंतर महावितरणने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी तत्पर कार्यवाही करावी,” अशी अपेक्षा प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली.






