प्रजा गटाच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
फलटण, हिंगणगाव : हिंगणगाव (ता. फलटण) येथील चोरीला गेलेला पुनर्वसन डीपी अखेर महावितरणकडून बसविण्यात आला असून, परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, याच डीपीवरून परहर बुद्रुक या पुनर्वसित गावाला पाणीपुरवठा करणारे कनेक्शन असल्याने डीपी सुरू झाल्यामुळे गावाचा पाणीपुरवठ्याचाही प्रश्न सुटला आहे.
संबंधित डीपी १७ जूलै २०२६ रोजी चोरीला गेला होता. डीपी चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी शेतातील पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होण्याबरोबरच पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्याचबरोबर परहर बुद्रुक येथील पाणीपुरवठ्याचे कनेक्शन याच डीपीवर असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद पडला होता.
महावितरणकडून अपेक्षित तातडीचा प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी प्रजा गट जनसंपर्क कार्यालय, फलटण येथे प्रदीप झणझणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन झणझणे यांनी तत्काळ महावितरण कार्यालय गाठत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
डीपी चोरीला गेल्यानंतर किंवा नादुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहणे योग्य नसून, शेतकरीहिताच्या दृष्टीने तातडीने पर्यायी अथवा नवीन डीपी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. तसेच संबंधित नियम व शेतकऱ्यांच्या हिताची कार्यपद्धती याबाबतही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
या पाठपुराव्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगणगाव येथील पुनर्वसन डीपी बसविण्यात आला आणि परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीज समस्येला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतपिकांवरील संभाव्य संकटही टळले आहे. त्याचबरोबर परहर बुद्रुक गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
डीपी सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रजा गट तसेच महावितरणचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तातडीने पाठपुरावा केल्याबद्दल प्रदीप झणझणे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
“शेतकऱ्यांचा वीजप्रश्न हा केवळ एका डीपीपुरता मर्यादित नसून त्यांच्या पिकांच्या आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे डीपी चोरी अथवा नादुरुस्तीच्या घटनांमध्ये महावितरणने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवावी” अशी अपेक्षा प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली.






