फलटण वीज महावितरणचा अन्यायी व अयोग्य कारभार
फलटण वीज महावितरण ग्रामीण भागामध्ये दोन महिन्यांपासून एकाएकी वीज कपात करत आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वीज कपात करण्यात येत असल्याने फलटण तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण भाग अंधारमय झाला आहे. हेच ते जनतेचं सरकार आहे का, असा संतप्त सवाल फलटणकर जनतेच्या वतीने प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस सरकारला केला आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या एकाएकी वीज कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड उकाडा, अंधार, जनावरांच्या दुधाच्या धारा काढण्याच्या समस्या आणि असुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसत आहे.
रात्रीच्या वेळेस वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे घरफोड्या व चोऱ्यामाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच डास आणि मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून फलटणकर जनता अक्षरशः हैराण झाली आहे.
या संपूर्ण परिस्थितीस फलटण वीज महावितरण जबाबदार असल्याचा गंभीर आरोप प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केला आहे. महावितरणची कार्यपद्धती पूर्णपणे अयोग्य असून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास प्रजा गटाच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभारणार असल्याचा निर्वाणीचा इशाराही प्रदीप झणझणे यांनी दिला आहे.






