सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या “मी फक्त पोस्टमन आहे” या वक्तव्यावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “जयकुमार गोरे हे आधी पालकमंत्री आहेत की पोस्टमन, हे जनतेला स्पष्ट करावं,” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी भाजपच्या प्रचारशैलीवरही टीका केली.
सोलापूर : रविवारी झालेल्या प्रचारसभेत जयकुमार गोरे यांनी “मी फक्त वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करणारा पोस्टमन आहे,” असे वक्तव्य केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी बेईमानी करणाऱ्यांची उलटी गिनती सुरू झाली असून त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “विधान परिषद निवडणूक सुरू असताना विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र भाजपचे नेते विकास सोडून वैयक्तिक टीका करण्यातच वेळ घालवत आहेत.”
यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “कोणतीही निवडणूक आली की मोहिते-पाटील घराण्यावर टीका करण्याची काही नेत्यांची सवयच झाली आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोप करण्यात त्यांना अधिक रस दिसतो,” असा टोला लगावला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूंनी शाब्दिक हल्ले तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकास विरुद्ध वैयक्तिक टीका असा वाद आता प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनू लागल्याने आगामी काळात राजकीय वातावरण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.







