फलटण, सासवड (झणझणे) : प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, झणझणे-सासवड (ता. फलटण) येथील चोरीला गेलेला पाटील डीपी महावितरणकडून तातडीने बसविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीजपुरवठ्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित डीपी २७ जुलै २०२६ रोजी चोरीला गेला होता. डीपी चोरीला गेल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि शेतातील पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. महावितरणकडून तातडीने प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी १० ऑगस्ट रोजी प्रजा गट जनसंपर्क कार्यालय, फलटण येथे प्रदीप झणझणे यांची भेट घेऊन समस्या मांडली.
यानंतर झणझणे यांनी शेतकऱ्यांसह फलटण येथील महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी चोरीला गेलेल्या डीपींच्या क्रमवारीचा दाखला देत संबंधित अधिकाऱ्यांनी इतर १६ चोरीचे डीपी बसविल्यानंतरच हा १७ वा डीपी बसविण्यात येईल, असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या उत्तरावर समाधान न झाल्याने प्रदीप झणझणे यांनी सातारा जिल्हा महावितरणचे मुख्य अभियंता हळनोर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी फलटण महावितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत, डीपी चोरीला गेल्यानंतर अथवा नादुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा अधिक काळ खंडित राहू नये, अशी मागणी केली. तसेच संबंधित नियम व शेतकऱ्यांच्या हिताची कार्यपद्धती यांची अधिकाऱ्यांना आठवण करून दिली.
यानंतर मुख्य अभियंता हळनोर यांनी फलटण येथील संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून झणझणे-सासवड येथील पाटील डीपी उपलब्ध करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.
या पाठपुराव्यानंतर १२ ऑगस्ट २०२६ रोजी पाटील डीपी बसविण्यात आला आणि परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीज समस्येला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतपिकांवरील संभाव्य संकटही टळले आहे.
डीपी सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रजा गटाचे व महावितरणचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल प्रदीप झणझणे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
“शेतकऱ्यांचा वीजप्रश्न हा केवळ एका डीपीपुरता मर्यादित नसून त्यांच्या पिकांच्या आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे महावितरणने डीपी चोरी अथवा नादुरुस्तीच्या घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा,” अशी अपेक्षा प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली.






