फलटण : साखर आयुक्त पुणे यांना दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे संतप्त झालेल्या फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांकडुन ऊस दर जाहीर करणेबाबत कायम होणा-या दिरंगाईची पोलखोल केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील एकूण चारही साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरु केली आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप प्रति टन ऊस दर किती देणार आहे हे मात्र जाहीर केलेले नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक असुन याबाबत सर्व शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार फलटण व उपविभागीय अधिकारी उपविभाग फलटण यांना रितसर निवेदन दिलेले आहे. चालू हंगामामध्ये ऊसाचा दर प्रति टन ३७५१/- रुपये मिळावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. सदर निवेदन हे फलटण तालुका ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने साखर आयुक्त पुणे यांना देण्यात आल्याचे सोनवडी व डोंबाळवाडी गावचे युवा नेतृत्व अनुक्रमे अक्षय सोनवलकर व अजय सुळ यांनी सांगितले.
साखर कारखानदारांनी मात्र ऊस दर जाहीर न करता साखर कारखाने सुरु केल्यामुळे फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व ऊस दरा विषयीची निर्माण झालेली जागरूकता पहावयास मिळत आहे. फलटण तालुक्यातील सर्व कारखाने व फलटण शहर पोलीस स्टेशन फलटण यांना ही दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पासून शेतकऱ्यांनी सर्व कारखान्यांचे काटे बंद करून त्याच ठिकाणी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनातून सांगितले आहे.
तसेच शेतकरी व कारखानदार यांच्यातील संघर्ष टाळायचा असेल तर आपण साखर आयुक्त या नात्याने संबंधीत सर्व कारखान्यांना त्वरित ऊस दर जाहीर करण्याबाबत आदेश देऊन शेतकऱ्यांवरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी व संबंधीत अधिकारी, कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी यांची संयुक्तिक बैठक लावून लवकरात लवकर ऊस दर घोषित करावा. आज तागायत फलटण तालुक्यात ऊस दर जाहीर न करता शेतकऱ्यांची ऊस तोडून नंतर त्यांच्या पोटावर पाय देण्याची कारखान्याची सवय मोडून काढावी व सहकार टिकवून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील निवेदनाद्वारे साखर आयुक्त पुणे यांचेकडे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अक्षय सोनवलकर, अजय सूळ व आबा सरक यांच्या सह्या आहेत.







