सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या भव्य मेळाव्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात उपस्थितांनी एकमुखाने महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.
या मेळाव्यास ज्येष्ठ नेते जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात विविध मान्यवरांनी महाविकास आघाडीची एकजूट, विकासाभिमुख भूमिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. तसेच आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांवर आणि महाविकास आघाडीच्या सामूहिक नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी सांगली-सातारा विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार अभयसिंह खाशेराव जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानत, “महाविकास आघाडीची एकजूट आणि मान्यवर मतदारांचे आशीर्वाद यांच्या बळावर १८ जून रोजी प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल, असा दृढ विश्वास आहे,” असे सांगितले.
मेळाव्यातील उस्फूर्त वातावरण, कार्यकर्त्यांचा जोश आणि उपस्थितांची मोठी संख्या यामुळे तासगाव–कवठेमहांकाळ परिसरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






